पंधरा लाखांचा दीड क्विंटलचा गांजा पिशोर येथे पोलिसांकडून जप्त

Foto

कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतखेडा शिवारात पिशोर पोलिसांनी छापा मारून पंधरा लाख रुपयांचा दीड क्विंटल वजनाचा गांजा जप्त करीत आरोपीस ताब्यात घेतले.

पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागरे यांना जैतखेडा शिवारातील काकासाहेब वेताळ यांच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती मिळाली. नागवे यांनी बीट जमादार वसंत पाटील व पोलीस कर्मचारी यांना पाठवून याबाबतची खात्री केली. खात्री होताच नागवे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. तसेच तहसीलदार यांनाही माहिती दिली. 

गुरुवारी रात्री साडेआठ वाजता काकासाहेब नाना वेताळ (६०) यांच्या जैतखेडा शिवारात गट क्रमांक २१५ मध्ये जाऊन वेताळ यांच्या शेतातील कपाशी तूर या पिकात असलेल्या शेतामध्ये अंदाजे १२१ गांजाची झाडे लावलेली आढळली. १२१ गांजा झाडांचे वजन दीड क्विंटल भरले. बाजार भावाप्रमाणे प्रति किलो दहा हजार रुपयेप्रमाणे पंधरा लाख रुपयांचा गांजा गुरुवारी रात्री साडेआठ वाजता जप्त केला.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, उपविभाग कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे, पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, पोलीस हवालदार वसंत पाटील, रायटर विलास सोनवणे, लालचंद नागलोत, गणेश कवाल, संजय लगड, सुनील भिवसने, विजय भोटकर, पवन खंबाट, कौतिक सपकाळ, अन्सार पटेल, नितीन शिंदे यांनी केली आहे.

 फॉरेन्सिक टीममधील तज्ञ ज्योती जगताप व सहकारी तसेच अंमलदार संदीप जोनवाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी अधिकारी दिलीपकुमार सोनवणे, नायब तहसीलदार, कन्नड उपकृषी अधिकारी बबन पवार, शासकीय पंच राजू नवले, पोलीस पाटील जैतखेडा उपस्थित होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे करीत आहेत.